नाशिक : फेब्रुवारी महिन्याच्या ११ तारखेपासूनच्या आठवडाभरात पाचव्यांदा कोरोनाबाधित संख्येने दोनशेचा आकडा ओलांडला असून गुरुवारी (दि. १८) ही संख्या तीनशेनजीक अर्थात २९७ पर्यंत पोहोचली आहे. तर १२० रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून शहरात २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०७९ पर्यंत पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार०१९ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ५८३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १,३५७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.११ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.७४, नाशिक ग्रामीण ९६.४०, मालेगाव शहरात ९२.८९, तर जिल्हाबाह्य ९४.२५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २४ हजार ३५० असून, त्यातील चार लाख ४ हजार २७३ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १९ हजार ०१९ रुग्ण बाधित आढळून आले असून, १०५८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.