नाशिक : एमजीरोडवर चॉपरने वार करून खून करण्यात आलेल्या मनीष रेवर (२८. रा आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) प्रकरणातील प्रमुख संशयित चेतन लेवे यासह एका अल्पवयीन संशयितास भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी (दि़२३) ताब्यात घेतले़ दरम्यान, जुन्या वादातून खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले असून, या खुनातील तिसरा संशयित सिद्धार्थ इस्ते हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि़२२) रात्रीच्या सुमारास मनीष रेवर हा एमजीरोडवरील श्याम सिल्क अॅण्ड साडी दुकानाजवळ उभा होता़ यावेळी प्रमुख संशयित चेतन पोपट लेवे (२०, रा. कमळनगर हिरावाडी पंचवटी), पवार मळा पंचवटी येथील अल्पवयीन संशयित व सिद्धार्थ इस्ते (रा. कर्णनगर पंचवटी) या तिघांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून रेवर याच्यावर चॉपरने वार करून त्याचा खून केला़ रेवर याच्यावर वेदमंदिरासमोर गॉगल विक्रेत्याचा खून केल्याचा आरोप होता. तसेच मारहाण, दुचाकीचोरीचेही गुन्हे दाखल आहेत. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने प्रमुख्य संशयित चेतन लेवे व एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे़ या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर जुन्या वादातून हा खून केल्याचे समोर आले आहे़
रेवर खूनप्रकरणी दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 1:15 AM