महिला असूनही चाकूधारी चोरट्याशी दोन हात करण्याचे दाखवलेले धाडस आणि दिलेली झुंज ही घटना वाखाणण्याजोगी होती. या एका घटनेने सविता सागर मुर्तडक यांना कोणी रणरागिणी, तर कोणी नाशिकची झांसी अशी विशेषणे लावली जात आहेत. कारण घटना तशीच घडली होती. सविता या बॅँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात व्यस्त असताना एक चोरटा तोंडाला रु माल बांधून केंद्रात घुसला आणि चाकू काढून सविता यांच्याकडून ड्रॉवरमध्ये असलेल्या पैशांची मागणी करू लागला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मारून टाकण्याचीही धमकी दिली. परंतु सविता यांनी या धमकीला भीक घातली नाही. यावेळी चोरटा आणि सविता यांच्यात झटापट झाली. यावेळी सविता यांना चाकू लागल्याने दुखापत झाली. या झटापटीत चोरट्याने ४० हजार रु पये घेऊन पसार झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सविता यांनी आरडाओरड करून दरवाजा उघडून घेतला. जिवावर उदार होऊन सविता यांनी चोरट्याशी दोन हात करण्याची हिंमत दाखविली. त्यांच्या या धाडसाचे शहरात सर्वत्र कौतुक करण्यात आले.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही त्यांच्या धाडसाची दखल घेऊन पोलीस खात्यातर्फे सविता यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सविता यांनी दाखविलेल्या शौर्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
चाकूधारी चोरट्याशी दोन हात करणारी रणरागिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:25 AM