मालेगाव : येथील अंजुमन चौकात दोन बांगलादेशी तरुणांना अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मोहब्बत अली करीम मात्तबर (४८) आणि जियाजुल रूंजीत खान (२८) दोघे रा. मुळगाव जि. मदारीपुरा, बांगलादेश हल्ली मुक्काम शिवाजीनगर, कॅम्प हे दोघे साडी विक्री करत असताना नागरिकांना दिसले. त्यांचा संशय आल्याने अपर पोलीस अधीक्षक कडासने यांना कळविले. त्यांच्या आदेशावरुन त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी केलेल्या तपासणीत मोहब्बतल अलीजवळ बंगाली भाषेतील जन्म दाखला व ५०० च्या दोन नोटा तर त्याचा सहकारी जियाउल्लजवळ बांगलादेशी चलन आणि जुन्या वर्तमानपत्राच्या कागदाच्या रोलमध्ये साबणाचे तुकडे मिळून आले. या दोघांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार असिफुद्दीन अयाजुद्दीन शेख यांनी तक्रार दिली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जे. टकले करीत आहेत. या दोघांना आज न्यायालयात उभे केले असता १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरम्यान, या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काल सायंकाळी सातच्या सुमारास ते भाड्याने राहत असलेल्या शिवाजीनगर येथील घराची बॉम्बशोधक व नाशक पथकासह इतर पथकाने तपासणी केली. यावेळी मोठा बंदोबस्त पाहून परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होत.
दोन बांगलादेशी घुसखोरांना अंजुमन चौकात अटक
By admin | Published: December 15, 2015 11:51 PM