सचिन सांगळे
नांदूरशिंगोटे (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील कणकोरी- निऱ्हाळे रस्त्यावर गुरुवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जाम व लेंडी नदीच्या संगमावर पुरात वाहून जाताना दोघे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. दोन तरुणांनी पाण्यात उड्या घेत वाहून जाणाऱ्यांचे प्राण वाचवले आहे. हा सगळा थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
गोविंद भिकाजी अहिरे व संजय आंधळे हे दोघे सकाळी कणकोरी-निऱ्हाळे रस्त्याने दुचाकीवरून जात होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता. काही वाहने पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र, एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली. तो सुखरुप पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ अहिरे व आंधळे यांनीही दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह दोघे पुलावरुन लोटले गेले. नदीपात्राच्या कडेला पूर पाहत उभे असलेल्या चंद्रकांत सांगळे व निलेश बर्डे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या फेकल्या व दोघांना मोठ्या हिंमतीने वाचवले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा सगळा थरार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.