नाशिक/पंचवटी : द्वारकेच्या दिशेने आडगावकडून नव्याकोऱ्या दुचाकीने भरधाव जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून दुचाकी आदळल्याने दोघा पोलीसपुत्रांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की एका तरुणाचे शीर धडापासून वेगळे झाले. दोघांनी हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित प्राण वाचले असते अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आडगावकडून द्वारकेच्य दिशेने नव्या को-या स्पोर्टस् बाईकवरून भरधाव संदीप सुरेश गवारे (३०,रा. मडवाई हाईटस्, अमृतधाम) सागर शेजवळ (३०, रा. ग्रामिण पोलीस मुख्यालय) हे मित्र जात होते. बळी मंदीराजवळ महामार्गावर उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे एकेरी मार्गावरून महामार्गाची वाहतूक सुरू आहे. जो मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. त्या मार्गावरून रस्ता खुला असल्याचे समजून प्लॅस्टिक दुभाजक ओलांडून प्रवेश करत या दोघांनी दुचाकी भरधाव द्वारकेच्या दिशेने दामटविली. दरम्यान, या रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरवर (जी.जे.१८ एटी९९३४) पाठीमागून त्यांची दुचाकी जाऊन आदळली. दोघांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. धडक इतकी भीषण होती की एका दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे झाले. हा अपघात बळीमंदीराजवळ औदुंबरनगरसमोर घडला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड, शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक सदानंद इनामदार हे तातडीने कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहचले. मृतदेह झाकून रुग्णवाहिकेतून त्वरित जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविले. या दुर्दैवी घटनेने नाशिक ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
उभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून दोघे पोलीसपूत्र जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:53 PM
दोघांनी हेल्मेट परिधान केले असते तर कदाचित प्राण वाचले असते अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण पोलीस दलावर शोककळा रस्ता खुला असल्याचे समजून प्लॅस्टिक दुभाजक ओलांडून प्रवेश