लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत भूमिका साकारलेल्या दोन अभिनेत्री, एका रिॲलिटी-शोमधील अभिनेत्रींसह १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ व्यक्तींना नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीच्या दोन आलिशान बंगल्यात रेव्ह पार्टी करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी मुंबईतून एका नायजेरियन नागरिकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
येथील दोन खासगी बंगल्यात शनिवारी मध्यरात्री ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारख्या अमली पदार्थांची नशा करत बॉलिवूडमधील चार महिलांसह २२ उच्चभ्रू व्यक्तींचे ‘झिंग झिंग झिंगाट...’ सुरू होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंगल्यांवर पहाटे छापा टाकला. अमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामूहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये इराणची नागरिक असलेली एक महिला आहे.
पार्टीत हेही सामील
n पार्टीत बिग बॉसच्या सीझन-२ मधील प्रसिद्ध अभिनेत्री हीना पांचाल हिचाही सहभाग असल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून आले. n दोन कोरिओग्राफर, एक विदेशी महिला तसेच पीयूष सेठिया, अमित लाट, आशिष लाट, रा. त्रिवेदी, विशाल मेहता, नीरज सुराणा, रोहित अराेरा, हर्ष शहा, दानिश खान, अबू बकर हनिफ शेख (सर्व, रा. मुंबई व पुणे) यांच्यासह १२ महिला असे २२ जण आढळले. n इगतपुरीतील हॉटेलसाठी ऑनलाइन बुकिंग होत असते आणि परिसरातील हॉटेल्स पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही इगतपुरी तालुक्यात पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान हिचे प्रकरण खूप गाजले होते.
अमली पदार्थांचा पुरवठा मुंबईतून?पार्टी करण्यासाठी इगतपुरीत दाखल झालेल्या २२ जणांनी त्यांच्यासोबत अमली पदार्थांचा मोठा साठा मुंबईतून आणल्याचा पोलिसांना संशय आहे. हा पुरवठा कोठून आणि कोणी केला याच्या तपासासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने मुंबईत रवाना झाले आहे. मुंबईतून एका नायजेरियन नागरिकालाही ताब्यात घेऊन इगतपुरीत आणले आहे.
वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणापीयूषच्या वाढदिवसानिमित्त दोन बंगल्यात हा सगळा धिंगाणा शनिवारी रात्री ८ वाजेनंतर सुरू झाला होता. १२ वाजता पीयूष सेठिया याने वाढदिवसाचा केक कापला आणि हिंदी-मराठी गीतांच्या चालीवर सर्व लोक थिरकत मद्यप्राशनासोबत हुक्का, चरस, गांजा, कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या सेवनात दंग झाले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.
गोपनीय माहितीवरून शनिवारीमध्यरात्री आम्ही छापा मारला. अमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदींचा तपास केला जात आहे. एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. - सचिन पाटील,पोलीस अधीक्षक, नाशिक