ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेले दोन चुलत भाऊ असलेल्या शाळकरी मुलांचा आज बुडून मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की वरवंडी येथील सुनील राजाराम जाधव वय 12 व रोशन संजय जाधव वय 11 हे चुलत भाऊ आंबेदिंडोरी येथे शिकत होते. आज माघी पौर्णिमेला वरवंडी येथे यात्रा असल्याने शाळेत न जाता घरी राहिले होते. दोघे बंधू सकाळी 11 च्या दरम्यान वस्तीवरील घरातून यात्रेत जायचे म्हणून गावात गेले. मात्र ते गावात जाण्याऐवजी महावीर पॉलिटेक्निक जवळ असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेले व पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडून मरण पावले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुले घरी न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाही. तलावाकडे शोध घेतला असताना त्यांचे कपडे तलावाच्या कडेला आढळल्याने पाण्यात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळला. या दुर्दैवी घटनेने जाधव कुटुंबीय व संपूर्ण गावावर शोककळा पसरली . दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.