सायखेडा : चांदोरी येथे जुन्या कौलारू घराची भिंत शेजारील धाब्याच्या घरावर कोसळल्याने ढिगाºयाखाली दबलेल्या दोघा भावांचे प्राण वाचविण्यात गावकºयांना यश आले. तब्बल अर्धा तास ढिगाºयाखाली अडकून असलेल्या दोन मुलांना वाचविण्यात आल्याने देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय आला.जीर्ण झालेल्या कौलारू दुमजली घराची भिंत बुधवारी (दि. ९) सायंकाळी अचानक कोसळून शेजारील तुकाराम चव्हाण यांच्या धाब्याच्या घरावर पडली. त्यामुळे धाबे कोसळून मातीच्या ढिगाºयाखाली अमोल तुकाराम चव्हाण (१०) व कृष्णा तुकाराम चव्हाण (८) ही दोन मुले अडकली. त्यांची आई ओट्यावर होती तर वडील वाहनचालक असल्याने बाहेरगावी होते. मोठा आवाज झाल्याने शेजारील डॉ. प्रल्हाद डेर्ले बाहेर आले. त्यांनी हा प्रकार पाहताच माजी सरपंच संदीप टर्ले यांना फोन करून विद्युत पुरवठा खंडित करावयास सांगितला. काही क्षणात विद्युत पुरवठा बंद झाला त्यामुळे नागरिकांनी तत्काळ माती बाजूला काढण्यास सुरुवात केली. अर्धा तास मातीच्या ढिगाºयाखाली असलेल्या दोन मुलांना बाहेर काढण्यास यश आले. काही प्रमाणात जुन्या विटा अंगावर पडल्याने मातीत पोकळी निर्माण झाली. त्यामुळे आॅक्सिजन मिळाला; मात्र लहान असलेल्या कृष्णाच्या नाकात आणि तोंडात पूर्ण माती गेली होती. नशीब बलवान असल्याने अनर्थ टळला. भेदरलेल्या दोघा मुलांना तत्काळ रुग्णालयात नेत उपचार सुरू करण्यात आले. काही वेळात मुले ओळखू लागल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळची वेळ असल्याने शंभरच्या आसपास युवक काही वेळात जमा झाल्यामुळे मोठा मातीचा ढीग बाजूला करता आला. यावेळी सरपंच संदीप गडाख, सायखेडा येथील पोलीस निरीक्षक अंबादास मोरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ढिगाºयाखाली दबलेले दोघे भाऊ सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 11:20 PM