----
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि. २) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या संजरी नगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती. घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलिंडर बसवत असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता, सिलिंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलिंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट होऊन फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती.
आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तत्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी येत तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या दुर्घटनेत सय्यद नुसरत रहीम (२५), शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५), नसरीन नुसरद सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सय्यद (४९), आरीफ सलीम अत्तार (५३), सय्यद लियाकत रहीम (३२), रमजान वलिऊल्ला अन्सारी (२२) असे आठ लोक भाजले होते. शनिवारी (दि. ३) रात्री उशिरापर्यंत उपचारादरम्यान नसरीन नुसरद सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सैयद (४९) या नणंद-भावजयीचा मृत्यू झाला तर रविवारी नसरीनचा पती नुसरद रहीम सैय्यद आणि त्याचा सख्खा भाऊ लियाकत रहीम सय्यद यांचाही दुर्दैवाने मृत्यू झाला. नुसरद ६३ तर लियाकत २७ टक्क्यांपर्यंत भाजला होता तर नणंद-भावजयी ९५ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात भाजल्या होत्या. शोएब अन्सारी हा तरुणही ९० भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
-----इन्फो----
सय्यद कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर
जुन्या नाशकातील संजरी नगर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबियांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत सय्यद कुटुंबाने आपल्या दोन तरुण मुलांसमवेत मुलगी व सुनेला कायमचे गमावले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी नणंद-भावजयीच्या मृतदेहांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी होत नाही तोच रविवारी दोघा तरुण मुलांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेने सय्यद कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबात लागोपाठ चार मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.