ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. २८ - तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारात कादवानदी तिराजवळ आज दुपारी बिबट्याचे सुमारे चार महिन्याचे दोन बछडे पकडण्यात आले. मात्र मादी फरार असून तिला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या वावराने नागरिक भयभीत झाले आहे. गेल्या दोन महिन्यात सात बिबटे व तीन बछडे असे दहा बिबटे पकडण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारात पालखेड धरणाचे खाली कादवा नदीतीरी पुंडलिक आरंगडे, डॉ. इंगळे यांच्या शेतात आज दुपारी एक मादी व दोन बछडे आढळून आल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले. यावेळी मादी पळून गेली. मात्र तिचे दोन बछडे हे गवतात लपून बसले होते. ग्रामस्थांनी त्यांना प्लॅस्टिक जाळी खाली सुरक्षीतरित्या पकडले. सरपंच संदीप उगले यांनी वनविभागाला कळविले. यानंतर वनविभागाचे अधिकारी वाडेकर यांनी घटनास्थळी पिंजरा घेऊन येत बछड्यांना पिंजऱ्यात टाकले व मादी पकडण्यासाठी तेथे पिंजरा लावला.