नाशिक : अगोदरच दरमहा तोट्यात चालणाऱ्या महापालिकेच्या सिटी लिंक बससेवा चालविणाऱ्या ठेेकेदाराकडून तर कधी वाहकांकडून वारंवार होणारे बस बंद आंदोलन व त्यातून प्रवाशांची होणारी ससेहोलपट पाहता महापालिका प्रशासनाने मॅक्सिकॅब या कंपनीबरोबरच नागपूरच्या युनिटी या कंपनीलाही बस चालविण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नाशिक रोडच्या डेपोचे संचलन नवीन कंपनीकडून केले जाणार आहे. दोन कंपन्या असल्यामुळे एकमेकांना चेकमेट देण्याचा प्रयत्न या माध्यमातून मनपाने केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला सिटी लिंकच्या वाहकांचा संप सोमवारी (दि.७) सकाळी मागे घेण्यात येऊन नियमित सेवा सुरू करण्यात आली असली तरी गेल्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत तीन ते चार वेळा बससेवा ठप्प करण्याचा प्रकार घडला आहे. कधी ठेकेदाराने महापालिकेकडून बिले मिळत नसल्याचे कारण देत सेवा बंद केली तर कधी ठेकेदाराकडून वाहकांना नियमित वेतन अदा केले जात नसल्याच्या तक्रारीवरून संप करण्यात आला आहे. करारनाम्यानुसार बससेवा बंद केल्यास ठेकेदाराला दंड करण्याची तरतूद असली तरी, ठेकेदाराकडून दंड कमी करण्यासाठी महापालिकेवर दबाव टाकला जाण्याचे प्रकारही घडले आहेत.