नाशिक : करारनाम्यातील अटी-शर्तींनुसार पूर्ण क्षमतेने रस्त्यांवर नवीन घंटागाड्या न आणणाऱ्या दोघा ठेकेदारांवर महापालिकेने करवाईचा बडगा उगारला असून, ठेका रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. दरम्यान, बुधवारी जीपीएसद्वारे केवळ ८९ घंटागाड्या रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने सर्व ठेकेदारांना दंडात्मक कारवाईसंबंधीही नोटिसा बजावल्या आहेत. करारनाम्यानुसार कार्यादेश दिल्यानंतर घंटागाडी ठेकेदारांना २० डिसेंबरपासून शहरात २०६ घंटागाड्या रस्त्यावर आणण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार, मंगळवारी (दि. २०) रस्त्यावर केवळ ७६ घंटागाड्या धावल्याचे समोर आले तर बुधवारी (दि. २१) सहाही विभाग मिळून ८९ घंटागाड्या रस्त्यावर कार्यरत असल्याचे आढळून आले. त्यात पंचवटी विभागात १२, पश्चिममध्ये २०, पूर्व भागात २५, नाशिकरोड विभागात २८, सिडकोत ४ घंटागाड्यांचा समावेश होता. सातपूरमध्ये मात्र एकही घंटागाडी धावली नसल्याचे जीपीएस यंत्रणेमार्फत निदर्शनास आले. सहाही विभागातील ठेकेदारांनी सद्यस्थितीत १५५ घंटागाड्या रस्त्यावर आणण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले होते. परंतु त्याचेही पालन झालेले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्व ठेकेदारांना प्रतिदिन प्रतिवाहन १० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, तशा नोटिसाही बजावल्या आहेत. दरम्यान, सिडको विभागातील घंटागाडीचा ठेका जी. टी. पेस्ट कंट्रोल, पुणे या ठेकेदाराला देण्यात आला आहे. परंतु, सदर ठेकेदाराला वारंवार पत्र तसेच समज देऊनही त्याच्याकडून पूर्ण क्षमतेने घंटागाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने सदर ठेकेदाराला ठेकाच रद्द करण्यासंबंधीची नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच सातपूर भागातही पूर्ण क्षमतेने घंटागाड्या दिसत नसल्याने सय्यद आसिफ अली या ठेकेदारालाही महापालिकेने ठेका रद्द करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)
दोघा ठेकेदारांवर कारवाईचा बडगा
By admin | Published: December 22, 2016 12:20 AM