नाशिक: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पथकाने (सीबीआय) गुरुवारी (दि.१३) दोन लष्करी अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना ‘कॅट्स’च्या आवारातून अटक केली होती. संशयित मेजर हिमांशु मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले अशी या संशयितांची नावे आहेत. हे दोघेही संशयित मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसमध्ये (एम.ई.एस) नोकरीला होते. त्यामुळे कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कुलचा या अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसल्याची माहिती पुणे येथील संरक्षण विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली.
एका ठेकेदाराकडून बिलाच्या रकमेपोटी संशयित मिश्रा याने तक्रारदार ठेकेदाराकडून ५३ हजार ता वाडिले याने ६३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. या दोघांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ एम.ई.एसच्या इमारतीजवळ ताब्यात घेतले. कॅट्सच्या आवारातच ही इमारत आहे. दरम्यान, सीबीआयकडून कारवाईबाबतची माहिती देण्यात आली होती. दोघा संशयितांना सापळा कारवाई करणाऱ्या पथकाने शुक्रवारी (दि.१४) न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या दोघांना मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले आहे.
पुणे येथील संरक्षण विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी (दि.१५) या कारवाईबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यामध्ये त्यांनी वरील दोन्ही संशयित लाचखोर अधिकारी कॅट्सचे नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हे दोन्हीही लष्करी अधिकारी येथील मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसेस (एमईएस) या अस्थापनेत कार्यरत आहे. संशयित मेजर हिमांशू मिश्रा आणि मिलिंद वाडिले हे नाशिकरोड येथे गॅरिसन अभियंता म्हणून तैनात आहेत. चुकून हे अधिकारी कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, नाशिकरोडचा भाग असल्याची नोंद कारवाईदरम्यान केली गेली, असे सांगण्यात आले. संशयित अधिकारी नाशिकरोड येथील गॅरिसन अभियंता या पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचा कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
दोषींवर शिस्तभंगाची कारवाई
भारतीय सैन्यदल हे शिस्तप्रिय असून भ्रष्टाचाराविरुद्धचे शुन्य गैरप्रकार ही लष्कराची भूमिका आहे. त्यामुळे जे कोणी लष्करी अभियांत्रिकी सेवासारख्या (एम.ई.एस) महत्वाच्या विभागात कार्यरत असूनही अशाप्रकारे भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरुद्ध लष्कराकडून निश्चितच शिस्तभंगाची कठाेर कारवाई करण्यात येईल,असेही म्हटले आहे.
लष्कराने कारवाई करणाऱ्या सीबीआयच्या पथकासोबत चांगला समन्वय ठेवलेला आहे. दोन्ही यंत्रणांकडून याबाबत सविस्तर तपास केला जात आहे. ध्या लष्करी अभियांत्रिकी सेवा (MES) मध्ये कार्यरत असलेले एक मेजर रँक अधिकारी आणि नागरी संरक्षण कर्मचारी (कनिष्ठ अभियंता) यांची चौकशी सुरू आहे. लष्कराच्या कुठल्याही अस्थापनेत भ्रष्टाचारासह कुठल्याहीप्रकारच्या गैरवर्तनाला स्थान नाही. त्यामुळे दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"