नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असून त्यामुळे महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षतेचा भाग म्हणून समाज कल्याण विभाग आणि मेरी येथील कोविड केअर सेंटर पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे. तर जानेवारी अखेरीस निरोप दिलेल्या २७६ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय विभागात भरती करण्यात आली आहे.शहरातील वाढती रूग्ण संख्या बघता गुरूवारी (दि.११) शासकीय सुटी असतानाही महापालिकेत तातडीने बैठक घेण्यात आली. यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.नोव्हेंबर महिन्यात कोरोना बाधीतांची संख्या घटली आणि अनेक निर्बंध शिथील झाले त्याच बरोबर दुसऱ्या लाटेची शक्यता मावळल्याचे दिसत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढु लागली आहे. त्यामुळे पोलीस दलाने आधी रात्र संचारबंदी जाहीर केली होती. त्या पाठोपाठ सोमवारी तर संपुर्ण जिल्हाभरात अनेक निर्बंध लागु करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोनाचा कहर पुन्हा दिसू लागला आहे.
मंगळवारी (दि.९) एकाच दिवसात नऊ बाधीतांचा मृत्यू झाला होता. बुधवारी (दि.१०) १३३० बाधीत आढळले.त्यात नाशिक शहरातील ७६८ बाधीतांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेने गुरूवारी तातडीने बैठक घेतली आणि काही निर्णय घेतले आहेत.महापालिकेचे नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रूग्णालय हे कोरोना बाधीतांसाठी राखीव असून त्यापलीकडे खासगी रूग्णालयातील आरक्षीत बेड कायम आहे. सध्या मुबलक बेड उपलब्ध असले तरी पुढील आठवड्यापासून समाज कल्याण आणि मेरी येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे १ मार्च पासून महापालिकेने २७६ आरोग्य कर्मचाऱ्यांना महापालिकेत तीन महिन्यांसाठी मानधनावर नियुक्त केले असून त्यात ३८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उर्वरीत २२५ जणांना देखील टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेतले जाणार आहे.हापालिकेने कोविड केअर सेंटर केल्यानंतर सुमारे सातशे अतिरीक्त बेड उपलब्ध होणार आहेत. तसेच पूर्वदक्षतेचा भाग म्हणून एक हजार रेमडीसेव्हरची खरेदी करण्यात आली आहे. त्याच बरोबर बिटको आणि डॉ.झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्ट कार्यान्वित करण्यात आला आहे.