नाशिक : देशभरातील ग्राहकांना आॅनलाइन हॉटेल बुकिंग करून देणाऱ्या ‘ओयो’ या आॅनलाइन ट्रॅव्हल एजंट कंपनीने नाशिकच्या ४२ हॉटेलमालक आणि हॉटेलचालकांचे प्रत्येकी किमान पाच लाखांहून अधिक रकमेचे पर्यटक निवास शुल्क भरलेले नाही. २०१९ वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून सुमारे दोन कोटींहून अधिक रक्कम या कंपनीने न भरता फसवणूक केली असल्याचा आरोप नाशिकच्या रेसिडेन्शिअल अॅण्ड हॉटेल असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.संघटनेच्या वतीने अध्यक्ष रोहित उगावकर, अन्य पदाधिकाऱ्यांकडून फसवणुकीबाबत पोलीस उपायुक्तांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. संबंधित कंपनी ही पर्यटक आणि प्रवाशांना आॅनलाइन बुकिंग देऊन नाशिकच्या हॉटेलचालकांना एका महिन्यानंतर त्याचा परतावा देत होती. गत वर्षापर्यंत कंपनीने या करारानुसार हॉटेलचालकांना त्यांची रक्कम दिली. मात्र, या वर्षाच्या प्रारंभापासून हॉटेल व्यवस्थापनाशी चर्चा न करता परस्पर कमी शुल्क आकारणी केली जाणे, करारनाम्यात नमूद नसलेल्या बाबींचाही कंपनीच्या शुल्कात समावेश करणे तसेच करारानुसार महिन्यानंतर शुल्क परतावा न देता आठ महिने थकविणे यांसारखे प्रकार करण्यात आल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. निवेदन देताना संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश गोठी, जश ठक्कर, कुणाल ओंकार, संजय मुदलीयार आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत ओयो कंपनीचे नाशिक विभागाचे प्रमुख प्रशांत हिंदुजा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.ओयोने रक्कम थकवलेल्या ४२ जणांमध्ये १८ व्यावसायिक हे हॉटेल भाड्याने घेऊन चालविणारे आहेत. अशा हॉटेलचालकांना एकीकडे हॉटेलमालकाला द्यावे लागणारे मासिक भाडे भरणेच अशक्य झाले आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांची कुचंबना अधिक असून, त्यांच्यापुढे हॉटेल चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हॉटेल व्यावसायिकांना आॅनलाइन कंपनीकडून दोन कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:04 AM