नाशिक: द्राक्ष निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला कृषी उपसंचालक नरेंद्रकुमार आघाव याला बुधवारी (दि.४) जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आघावच्या घरी केलेल्या झडतीत दोन लाखांची रोकड, सुमारे अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने, जमीन खरेदीची कागदपत्रे, बँक आणि डिमॅट खात्याची पुस्तके सापडली असून, सर्व संपत्तीचा हिशेब करण्यास वेळ लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आघाव यास मंगळवारी (दि.३) दुपारी त्याच्याच कार्यालयात लाच घेताना अटक करण्यात आली होती. कृषी मालाच्या निर्यातीसाठी लागणारे परवाने मिळवून देण्याचे काम जे अॅण्ड जे एक्स्पोर्ट या फर्मच्या कर्मचाऱ्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कृषिमालाच्या निर्यातीसाठी लागणारे फायटो प्रमाणपत्रासाठी कृषी विभागात या कंपनीने अर्ज दाखल केला होता. मात्र, यापूर्वी दिलेल्या फायटो प्रमाणपत्रासाठी आघाव याने प्रत्येक प्रमाणपत्रासाठी पाचशे रु पये यानुसार एक लाख ६४ हजार रु पयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पहिल्यांदा एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्याने दर्शविली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.३) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना आघाव यास रंगेहाथ पकडले.
आघावला अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने त्याची बेहिशेबी मालमत्ता शोधण्यासाठी आघावच्या गोविंदनगर भागात असलेल्या आलिशान बंगल्यात झडतीसत्र राबविले. यावेळी त्याच्या घरात दोन लाख रु पयांची रोकड, सुमारे अडीच लाख रु पयांचे दागिने, जमिनी खरेदीच्या व्यवहारांची कागदपत्रे सापडली. याशिवाय आघावसह कुटुंबीयांची पाच-सहा बँका आणि डिमॅट खात्याची पुस्तके मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे पाल्यासाठी शैक्षणिक कर्जही काढल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले आहे.