सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत तिसऱ्या पॅनेलची शक्यता गृहीत धरून संभाव्य बंडखोरांना रोखण्यासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून व्यूहरचना केली जात असल्यामुळेच पॅनलच्या उमेदवारांची नावे जाहीर केले जात नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, उद्योग विकास पॅनेलने सिन्नरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल उभे ठाकले आहे. एकता पॅनलकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. ४१ जागांसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. प्रत्येक जागेसाठी चुरस आहेच. पहिल्या वर्षी उपाध्यक्ष (लघु उद्योग) असलेल्या दुसºया वर्षी अध्यक्षपद मिळत असल्याने उपाध्यक्ष पदासाठी चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सत्ताधारी गटाची डोकेदुखी वाढणार आहे. परिणामी उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास तिसºया पॅनलची निर्मिती होऊ शकते. बंडखोरी टाळण्यासाठी व तिसरे पॅनल रोखण्यासाठी श्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असली तरी नाराज झालेले उमेदवार बंडखोरी करणार नाहीत याची काळजी सत्ताधारी एकता पॅनल घेत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे या संदर्भातील हालचाली अधिक गतिमान झाल्या असून, प्रत्येक पॅनलप्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. उद्योग विकास पॅनेलने सिन्नरपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ उद्योजक रमेश नवले यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. यावेळी तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव, संजय महाजन, टी. एन. अग्रवाल, नामकर्ण आवारे, नारायण वाजे, एम. जी. कुलकर्णी, किरण वाजे, नितीन गायधनी आदींसह उमेदवार उपस्थित होते.
माघारीसाठी दोन दिवस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:49 AM