कसबे सुकेणे : कसबे सुकेणे येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कसबे सुकेणे ग्रामपालिका आणि व्यापाऱ्यांनी शहरात रविवारपासून (दि.१२) दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला असल्याची माहिती कसबे सुकेणे ग्रामपालिकेने दिली.कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कसबे सुकेणे येथे खबरदारी म्हणून पुन्हा रविवार आणि सोमवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. कसबे सुकेणे शहर व्यापारी आणि ग्रामपालिका यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी बाजार-पेठेतील व्यवहार सुरळीत राहतील. कसबे सुकेणे हे तालुक्यातील मोठ्या बाजारपेठचे गाव असल्याने व परिसरातील दहा ते बारा लहानमोठ्या गावांचे मध्यवर्ती बाजारपेठेचे केंद्र असल्याने कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच गीता गोतराने, उपसरपंच अतुल भंडारे, धनंजय भंडारे, छगन जाधव, विजय औसरकर, सुहास भार्गवे यांनी दिली.-----------------बाधितांची संख्या सहावरकसबे सुकेणे येथील कोरोना- बाधितांची संख्या सहावर पोहोचली असून, एका वृद्ध महिलेचे निधन झाले आहे. बाधितांच्या संपर्कातील वीस नागरिकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी दिली.
कसबे-सुकेणेत आजपासून दोन दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:50 PM