नाशिक : जिल्ह्यात पक्ष्यांचे अचानक मृत्यू होण्याचे प्रकार सुरूच असून, ग्रामीण भागापाठोपाठ शहरातदेखील दोन मृत कबुतर आढळले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेची यंत्रणादेखील सतर्क झाली असून, कुठेही पक्षी मृत अवस्थेत असल्याची तक्रार आढळल्यात पाच मिनिटात कर्मचारी पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसला तरी शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. साेमवारी (दि.११) जिल्ह्यातील सुरगाणा येथे सात ते आठ कावळे मृत अवस्थेत सापडले. त्यानंतर सिन्नर तालुक्यात बुधवारी (दि. १४) दातली येथे नऊ पाणकोंबड्या व एक बगळा मृत अवस्थेत सापडला होता. त्यांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता नाशिक शहरात दोन कबुतर मृत अवस्थेत आढळले आहेत. सकाळी अशोका मार्गावर ९ वाजता तर दुपारी सिडकोतील पेलिकन पार्कमध्येही मृत कबुतर आढळल्याचे महापालिकेला कळवण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही कबुतरे घेऊन अशोकस्तंभ येथील जनावरांच्या दवाखान्यात नेण्यात आले आणि पशुसंवर्धन विभागाने त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवल्याचे महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.
राज्य शासनाने बर्ड फ्लूसंदर्भात आता यंत्रणा उभी केली असून, त्यानुसार शहरासह जिल्ह्यात पक्ष्यांच्या मृत्यूंची नोंद अधिकृतरीत्या पशुवैद्यकीय विभागाच्या उपसंचालकांकडे असणार आहे. त्यांच्या मार्फत मृत पक्ष्यांचे नमुने पुण्याच्या प्रयेागशाळेत पाठवण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने सहा विभागात सहा विशेष वाहने केवळ मृत जनावरे उचलण्यासाठी आहेत. त्यामुळे महापालिकेला यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर ही वाहने तत्काळ पाठवण्यात येतील, असेही साेनवणे यांनी सांगितले.
कोट...
बर्ड फ्लू आजाराला नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच शहर व परिसरातील कुक्कुट पालन करणाऱ्यांनी पक्ष्यांमध्ये मरगळ आढळल्यास मनपाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून पशुसंवर्धन विभागास कळवावे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका