ओझर मर्चंट बँकेचे संचालक रत्नाकर कदम आणि भरत पगार यांच्यावर ही अपात्रतेची कारवाई झाली आहे. सहकार बचाओ आंदोलनास मिळालेले हे पहिले यश असल्याचे सहकार बचाओ आंदोलनचे शशिकांत कदम यांनी म्हटले आहे.
ओझर मर्चंटचे संचालक रत्नाकर विनायक कदम यांनी ओझर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून वेळोवेळी कर्जाची उचल घेतली होती. दरम्यान, ३१ मे २०१७ पासून त्यांच्याकडे कर्ज थकीत असल्याने त्यावेळी सदानंद कदम आणि दिवंगत सुकदेव चौरे यांनी तक्रार दाखल केली होती. रत्नाकर कदम हे बँकेचे थकबाकीदार असल्याने ते एखाद्या सहकारी संस्थेवर संचालकपदी राहण्यास पात्र ठरू शकत नाही, असा आक्षेप तक्रारदारांनी सहकार आयुक्तांकडे नोंदविला होता. सहकार आयुक्तांकडील या सुनावणीला कदम यांनी येण्याअगोदरच संचालक पदाचा राजीनामा दिला.
आणखी एक संचालक भारत विष्णूपंत पगार हे मारुती बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, ओझर (मिग) या बिगरकृषी पतसंस्थेचे थकबाकीदार असल्याने ओझर मर्चंट बँकेच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरल्याचे सहकार आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.