नाशिक: जिल्ह्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेलतगव्हाण व कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या दोन्ही महिला ग्रामसेविकांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना तडकाफडकी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निलंबित केले आहे. यातील योगीता बागुल यांना दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक तालुक्यातील बेलतगव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका राणी पिराजी हाटकर यांच्या कामकाजाबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने नाशिक पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात आली त्यात अनेक अनियमितता निदर्शनास आली आहे.
चौदाव्या वित्त आयेगाच्या रोकडवहीवर स्वाक्षरी नसणे, मागासवर्गीयांवर १५ टक्के खर्च न करणे, पहिल्या ग्रामसभेत वार्षिक लेखा विवरण पत्र चालू वर्षात योजनेच्या विकास कार्यक्रमांना बंधनकारक असताना कोरम पूर्ण नसताना सभा घेणे, ३० दिवस अनधिकृत गैरहजर राहणे, नरेगा अंतर्गत शौचालयांची कामे पूर्ण न करणे, महिला, दिव्यांग व मागासवर्गीयांच्या योजनांवर खर्च न करणे, चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम अखर्चित ठेवणे आदी कामाबाबत हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले.
गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक योगीता बागुल यांच्याबाबतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी आहेत. त्यांच्या ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीसाठी अधिकारी जाणार असतानाही बागुल ह्या पूर्वसूचना देऊनही गैरहजर राहिल्या तसेच ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही.
ग्रामपंचायतीच्या मुख्यालयी त्या थांबत नसल्याच्याही तक्रारी होत्या. यापूर्वीही बागुल यांना तक्रारीवरून निलंबित करण्यात आले होते. मात्र शासनाने संधी देण्याची सूचना केल्याने त्यावरून त्यांना सेवेत घेण्यात आले. परंतु त्यानंतरही त्यांच्या कामकाजात सुधारणा न झाल्याने योगिता बागुल यांनाही निलंबित करण्यात आले आहे.