नाशिक : वासाळी शिवारातील एका पाझर तलावाजवळ छायाचित्र काढताना शनिवारी (दि.४) अंबडमधील दोघा युवा मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वासाळी गावातील पोहणाऱ्या स्थानिक तरूणांनी तलावात शोध घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.निसर्गरम्य ठिकाण म्हणून गंगापूर धरण व आजुबाजुच्या परिसरात नेहमीच युवक, युवतींची भटकंतीसाठी गर्दी असते. सावरगाव, वासाळी, गोवर्धन, दुगाव, काश्यपी धरण परिसरातसुध्दा शहरी भागातील युवक-युवती दुचाकी, चारचाकीने नेहमीच हजेरी लावतात. सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले असल्याने अंबड खुर्द येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवासी असलेले अभिषेक भगवान जयस्वाल (१८), गणेश प्रमोद भारती (१९) हे दोघे मित्र पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ आले होते. यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.पर्यटनावर बंदी कायमवर्षासहलीवर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरसुध्दा बंदी कायम आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनदेखील वाढविण्यात आले आहे. यामुळे शहरालगतच्या धरण, तलाव, धबधब्यांच्या परिसरात पर्यटनाला जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. यामुळे शहरी भागातील युवकांनी गंगापूर, गिरणारे, हरसूल-वाघेरा घाट, त्र्यंबकेश्वर, पहिने, पेगलवाडी, दुगारवाडी या भागात भटकंतीला जाऊ नये, अन्यथा पोलीस व वनविभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:46 PM
यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले...
ठळक मुद्देअंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.