लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथील उत्तम जाधव व बोपेगाव येथील शांताराम कावळे या दोन जिवलग वारकरी संप्रदायातील मित्रांचा एक दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने संपूर्ण दिंडोरी हळहळ व्यक्त केली जात आहे.दिंडोरी तालुक्यातील असा एकही कीर्तन सप्ताह नाही की त्या ठिकाणी उत्तम जाधव आणि शांताराम कावळे यांचे कीर्तन झाले नाही; मात्र याच दोन मित्रांचा एका दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला आहे. या दोन मित्रांनी आळंदी, देहू, पंढरपूर तसेच अनेक ठिकाणच्या अखंड हरिनाम सप्ताहात अन्नदान करण्याची भूमिका घेत आपला सहभाग नोंदविला आहे.
या दोघांची मैत्री लहानपणापासून होती. शांताराम कावळे हे कादवा सहकारी साखर कारखाना येथे शेतकी विभागात नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. काही दिवस त्यांनी तज्ज्ञ संचालक म्हणून काम पाहिले होते. तर उत्तम जाधव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात वारकरी संप्रदायातील गायनाचार्य म्हणून परिचित होते. हे दोन्ही मित्र नेहमी एकत्र वारी, कुठेही सप्ताहाला एकत्रच असायचे. या जिवलग मित्रांच्या निधनाने दिंडोरी तालुक्यातील संपूर्ण वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.