सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे शनिवारी पहाटे ३ वाजता अटक केलेल्या चोरट्यासह त्याच्या आणखी एका साथीदाराकडून सिन्नर पोलिसांनी नऊ दुचाकी हस्तगत केल्या. दिंडोरीगाव व परिसरातून या दुचाकींची चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विजय गायकवाड, नितीन मंडलिक, भगवान शिंदे, प्रवीण गुंजाळ, विनोद टिळे, सचिन गवळी, काशीराम चंवडगीर यांच्या पथकास सिन्नर-घोटी रस्त्यावर घोरवड शिवारात हॉटेल साईउत्सवसमोर लाल रंगाच्या हिरो पॅशन (एमएच ४१, एफ २५५८) या दुचाकीवर बसलेला एक युवक संशयितरीत्या आढळून आला होता. गस्ती पथकाने हटकल्याने तो युवक दुचाकी घेऊन पळू लागला. संशयित युवकाचा पाठलाग करून पोलिसांनी त्यात पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला सिन्नर पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली.पोलिसांनी त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने अकोले तालुक्यातील चोमदेववाडी येथील भरत बहिरु रावते हा मोटारसायकल चोरीमध्ये साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी चोमदेववाडी येथून संशयित भरत रावते याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर दोन्हीही आरोपींनी दिंडोरी परिसरातून चोरलेल्या नऊ दुचाकी चोमदेव डोंगराच्या कपारीत लपवून ठेवल्याचे सांगितले. सदर नऊ मोटारसायकली सिन्नर पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)
दोघा चोरट्यांकडून नऊ दुचाकी हस्तगत
By admin | Published: March 06, 2017 12:30 AM