नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाउन काळात सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना तत्काळ बेड्या ठोकण्यास सतर्क बीट मार्शल जोडीच्या प्रयत्नांमुळे गुन्हे शोध पथकाला यश आले.दुचाकीस्वार सराईत सोनसाखळी चोरट्यांनी गुरूवारी (दि.२२) रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वडाळा-पाथर्डी रस्त्यात लॉकडाउनमध्ये पांडवनगरी भागात एका पादचारी महिलेचे मंगळसुत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो फसल्याने दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या चोरट्याने पर्स हिसकावून पोबारा केला. महिलेने तत्काळ ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. कक्षातून त्वरित इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील गस्तीवरील पोलिसांना बिनतारी संदेश धाडला गेला. गस्तीवरील बीट मार्शल, गुन्हे शोध पथक सतर्क झाले. बीट मार्शल पोलिसांना गस्तीदरम्यान कलानगर येथे दोघे संशयित दिसले पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी दुचाकी दामटविण्यास सुरूवात केली. यावेळी बीट मार्शल रवींद्र राजपूत, दिनेश पाटील, मुश्रीफ शेख यांनीही दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू ठेवत वॉकीटॉकीद्वारे गुन्हे शोध पथकाची मदत मागितली. तत्काळ तीघा बीट मार्शल पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. तोपर्यंत पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील, भगवान शिंदे , राजेश निकम, साहेबराव ठाकरे आदींचे गुन्हे शोध पथकदेखील घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सराईत गुन्हेगार संशयीत तुषार गोरडे (२४, रा. दातली, सिन्नर), अनिकेत सानप (१८, रा. संगमनेर) या दोघांना चांगलाच चोप देत वाहनात डांबले. या सराईत गुन्हेगारांकडून पोलीस चौकशीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलीस मागावर तरीही...सराईत सोनसाखळी चोर श्रीराम चौक, कानिफनाथ चौक, भगवती चौकातून पुढे दुचाकीवरून पसार होत असताना त्यांच्या मागावर पोलीस दुचाकीने पाठलाग करत होते. तरीदेखील या चोरट्यांनी पुन्हा भगवती चौक परिसरातून जाणा-या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला यावेळी दोघेही दुचाकीवरून घसरून आपटले अन् पोलिसांच्या तावडीत सापडले.