नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने महिलांमध्ये तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या त्रिकुटांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. त्याच्या दुसºयाच दिवशी बुधवारी (दि.१३) शहरातील गंगापूर, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी एकाच वेळी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले.सोनसाखळी, मोबाइल, दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला अपयश येताना दिसून येत आहे. जबरी चोरीच्या प्रकारात मोडणारे हे गुन्हे कमी होत नसल्याने नाशिककर हवालदिल झाले आहेत. दररोज आयुक्तालय हद्दीतील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीलपैकी एक तरी घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बारदान फाटा येथे ज्योती लक्ष्मण अहिरे (४६,रा. अष्टविनायक अपार्टमेंट, शिवाजीनगर) या रिक्षाची वाट बघत उभ्या होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीची ५१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास अमृतधाम परिसरात घडली. या घटनेत काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ग्राहक असल्याचा बनाव करत एकाने शांता गोविंद दिवाण (६०, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली, मात्र वेळीत दिवाण या सावध झाल्याने त्यांनी त्याचा हात धरत सोनसाखळी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने जोरदार हिसका देत सुमारे ५० हजार रुपये किमतीचा सोनसाखळीचा निम्मा भाग घेऊन ‘चल भाग’ असे म्हणत दुचाकीवरून पोबारा केला. ही घटना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.धाडसी चोरीसाठी हेल्मेटचा वापरएकीकडे अपघात टाळण्यासाठी पोलीस हेल्मेट वापराची सक्ती करत असताना दुसरीकडे सोनसाखळी चोर हेल्मेटचा जबरी चोरीसाठी वापर करताना दिसून येत आहे. अमृतधाम भागात ज्या पध्दतीने दोघे चोरटे पल्सर दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून आले आणि स्वत:ला ग्राहक भासवून काही वस्तू खरेदी करण्याचा बहाणाही केला. एक चोरटा दुचाकीवर पळून जाण्यासाठी दुचाकी सुरूच ठेवून होता. त्याच्या साथीदाराने दुकानात येऊन दिवाण यांच्याशी संवाद साधताना डोक्यावर हाफ हेल्मेट तसेच ठेवलेले होते.
शहरात दोन सोनसाखळ्या हिसकावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:32 AM