सुरगाणा - तालुक्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे दिंडोरी, कळवण, सुरगाणा या तालुक्याचे सिमेवर असलेले घागबारीतील खिराड धरणात बुडून आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.घागबारी जिल्हा परिषद शाळेत शिकणारे कु.योगेश रामचंद्र गायकवाड इयत्ता पाचवी वय (११), कु.मोनिका रामचंद्र गायकवाड इयत्ता तिसरी वय (९), हे सोमवारी सकाळची शाळा असल्याने शाळेत आले होते. मात्र शाळा सुटल्यावर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आजी मांगीबाई लक्ष्मण गायकवाड वय (५३,जवळच असलेल्या कळवण तालुक्यातील खिराडच्या धरणावर गोधडी पांघरून, कपडे धुवायला आजी दोन्ही भावडांना सोबत घेऊन गेली. धरणावर आजी गोधड्या (पांघरूण ) धुण्यात मग्न असतांना क्षणभर आजीचे भावडांकडे दुर्लक्ष झाले. दोन्ही भावंडे पाण्यात डुबक्या मारु न खेळत होते. तेवढ्यात मोनिकाचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात बुडायला लागली. हे भाऊ योगेशच्या लक्षात येताच बहिणीला वाचवायला तोही खोल पाण्यात गेला. बहिण घाबरु न गेल्याने तिने भावाला घट्ट मिठी मारली, त्याच वेळी हे दोन्ही भावंडे पाण्यात बुडत आहेत हे पाहताच आजी मांगीबाई हिने दोघांना वाचविण्याकरीता पाण्यात उडी घेतली. दोघेही भावंडांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी आजीला घट्ट मिठी मारून आवळून धरल्याने आजीही पाण्यात बुडू लागल्या. त्याच दरम्यान आजीचा नातू मुलीचा मुलगा युवराज गावित (६) याने ही सर्व घटना पाहिल्यावर आरडाओरडा करण्यास सुरु वात केली. युवराज धरणाच्या काठावर खेळत होता, म्हणून तो वाचला. आजुबाजुला असलेले शेतात काम करणारे गावकरी मदतीला धावून आले मात्र बराच उशीर झाल्याने या तिघा माय लेकांचा खिराडच्या धरणात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तेथील परिस्थितीची पोलीसांनी पाहणी केली. पोलिसांनी नातेवाईकांना पंचनामा करण्यास सांगितले मात्र मुलांचे आजोबा लक्ष्मण गायकवाड वाहन चालक प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव यांनी पंचनामा व शवविच्छेदन करण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांची नोंद पोलिसात दाखल करण्यात आली नाही.
आजीसह दोन नातवंडांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:33 PM