मनमाड : येथील रेल्वे स्थानकावरील व्यावसायिक स्पर्धेतून शहरातील बावन नंबर भागात मंगळवारी (दि.२५) रात्री उशिरा दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये एक इसमाचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या टोळक्याने गल्लीमधे घरासमोर लावलेल्या सर्व दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मारहाण करून पळून जात असलेल्या संशयितांना पोलिसांनी नाकाबंदी करून चांदवड येथे ताब्यात घेतले आहे.मनमाड येथे रेल्वे स्थानकावर चालणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेमधून दोन गटामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धुसफुस सुरू होती. या गटांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ हाणामारी सुध्दा झाली होती. या वादाचे पर्यवसान हाणामारीच्या घटनेत घडले. इंडियन हायस्कूल शेजारील ५२ नंबर भागातील एकतानगर मध्ये सुमारे १५ ते २० जणांच्या टोळक्याने हातात लाठ्या काठ्या, तलवारी, चॉपर घेऊन घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकींची तोडफोड केली व दिसेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण केली. काही घरांवर दगडफेक करण्यात आल्याने सर्वांची धावपळ उडाली. येथील समीर उर्फ पापा शेख याला घरातून बाहेर ओढून जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. शेख याचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात तणावपुर्ण वातावरण तयार झाले. हल्ला करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी नाकाबंदी करून चांदवड येथे ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळ तलवारी, चॉपर आदी हत्यारे आढळून आली आहेत. वातावरणातील तणाव पहाता या भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गुन्हा दाखलया प्रकरणी मयताची पत्नी नुसरत समीर शेख हिने मनमाड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इलियास सैयद, इस्माइल सैयद, हबीब शेख, इरफान सैयद यांच्यासह ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपींपैकी १८ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मनमाडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:35 PM
एकाचा मृत्यू : व्यावसायिक स्पर्धेतून घडली घटना
ठळक मुद्देसंशयीत आरोपींपैकी १८ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.