सातपूर: निमा निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने दोन गट पडले असून, समेट घडवून आणण्याच्या दृष्टीने तीनही पॅनलच्या नेत्यांनी विनंती केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून दिली आहे, तर एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने तिसरे पॅनल निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत रविवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. सत्ताधारी एकता पॅनलच्या काही ठराविक जागेवर उमेदवारांचे एकमत होत नसल्याने सरळसरळ दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी दर्शविली आहे. त्यामुळे माघारीच्या दिवशी माघारीचे अर्ज देण्याऐवजी समेट घडविण्याच्या दृष्टीने सत्ताधारी दोनही गट आणि उद्योग विकास पॅनेलने निवडणूक निर्णय अधिकाºयांना माघारीसाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सोमवारपर्यंत माघारीची मुदत वाढवून दिली आहे. दरम्यान, उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. म्हणून एकता पॅनलच्या श्रेष्ठींमध्ये गेल्या आठ दिवसांपासून चर्चेचे गुºहाळ सुरू होते. नाराज बंडखोरांकडून तिसºया पॅनलची निर्मिती होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवारी जाहीर केली जात नव्हती. शेवटी उमेदवारी माघारीच्या दिवशी जे व्हायचे ते झालेच. उमेदवारी देण्यावरून सत्ताधारी एकता पॅनलमध्ये एकमत न झाल्याने एकता दुभंगली आणि एकता पॅनेलमध्ये दोन गट तयार झाले आहेत. आता एकता विरुद्ध एकता आणि उद्योग विकास असे तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
सत्ताधारी एकता पॅनलमध्येच दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:35 AM