शहरात सध्या कोराेनाबाधितांची संख्या वाढत असून, बेड्सची संख्या कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड्स पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने नवीन बिटको रुग्णालयात दोनशे बेड वाढवले असून, त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ न शकणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर याच रुग्णालयात काेरोना चाचणी लॅब अखेरीस कार्यान्वित होण्याचा मार्ग मेाकळा झाला आहे. गेल्या २१ मार्च रोजी लॅबसाठी सर्व यंत्रणा उभारण्यात आली असली तरी शासनाच्या आयसीएमआरची परवानगी मिळणे आवश्यक हाेते. त्यासाठी गेल्या आठवड्यातच महापालिकेने अर्ज देखील केला होता. मात्र, त्याला बुधवारी (दि. ३१) मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला दोन ते अडीच हजार अहवाल रोज देण्याची या लॅबची क्षमता आहे. मात्र, नंतर आणखी कुशल मनुष्यबळ प्राप्त झाल्यानंतर पाच हजार नमुन्यांची रोज चाचणी होऊ शकते, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
दरम्यान, महापालिकेने केवळ कोविडसाठी राखीव ठेवलेल्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली असून, त्यामुळे चाचणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या देखील सुटणार आहे.
कोट...
महापालिकेने कोरोना लॅबसाठी तांत्रिक कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. आणखी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला अडीच हजार रुग्णसंख्या असली तरी नंतर मात्र पाच हजार नमुन्यांची चाचणी होऊ शकेल.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
कोट...
महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच्या पाठोपाठ डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात देखील ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे या टाकीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता या रुग्णालयात देखील ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहे.
- डॉ. राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधीक्षक, मनपा