नाशिक : शहरात पतंगाच्या नायलॉन मांजामुळे विविध दुर्घटना घडत असून, शहरात दुचाकीस्वार, पादचारी जखमी होण्याच्या घटनाही सातत्याने होत आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजारूपी संक्रांत शहरातील सहायक विक्रीकर आयुक्तांवर ओढावली. तर दुसऱ्या एका घटनेत जेलरोड भागात दुचाकीवरून जाणारे शिक्षक नायलॉन मांजा अडकल्याने जखमी झाले.विक्रीकर आयुक्त कार्यालयातील सहायक विक्रीकर आयुक्त समाधान महाजन हे संध्याकाळी कार्यालयातून घरी परतत असताना मुंबई नाक्याजवळ अचानक पतंगच्या मांजा गळ्याला अडकून ते जखमी झाले. यावेळी त्यांनी तोल सांभाळल्याने सुदैवाने दुचाकी घसरली नाही. महाजन हे हेल्मेट घालून दुचाकी चालवित होते; मात्र तरीदेखील मांजेचा त्यांचा गळ्याभोवती फास अडकला. त्यांनी तत्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केली आणि मानेभोवती अडकलेला मांजा काढला. यावेळी मांजा नायलॉनचा असल्यामुळे त्यांचा गळा कापला गेला तसेच मांजाचा फास उकलत असताना बोटालाही जखम झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. महाजन यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत जेलरोड जुना सायखेडारोड इंदिरा गांधी पुतळा येथून दुचाकीवर जात असलेल्या मनपा शाळा शिक्षकाच्या गळ्याला व हाताला नायलॉन मांजा अडकल्याने ते जखमी झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जेलरोड दसक येथे राहाणारे राजेंद्र सोनार हे नांदूर मनपा माध्यमिक शाळेत शिक्षक असून, शनिवारी ते शालिमार येथील भालेकर हायस्कूलमध्ये टीईटीच्या परीक्षेसाठी सुपरव्हीजनसाठी गेले होते. तेथील कामकाज आटोपून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते दुचाकीवरून जेलरोड जुना सायखेडारोड येथून रस्त्याने घरी जात असताना इंदिरा गांधी पुतळ्याजवळ पतंगीचा नायलॉनचा मांजा त्यांच्या मानेला अचानक घासल्याने त्यांना जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांनी आपली मोटारसायकल रस्त्यातच थांबवली. वाहनधारकाच्या मदतीने शिक्षक राजेंद्र सोनार हे गळ्याला घासून अडकलेला नायलॉनचा मांजा काढू लागताच त्यांचे हाताचे बोटदेखील कापून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी तो नायलॉनचा मांजा काढल्यानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. नायलॉनच्या मांजामुळे (प्रतिनिधी)
नायलॉन मांजा अडकून दोन घटनेत दोघे जखमी
By admin | Published: January 17, 2016 12:31 AM