घोटी : मुंबई - नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचे पुढील टायर फुटल्याने टॅँकर दुभाजक तोडून मुंबईकडे जाणाऱ्या एका वाहनावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकरचालक फरार आहे. महामार्गावर घोटीजवळ नाशिककडे जाणाऱ्या गॅस टँकरचे (क्र. जीजे १२ एडब्लू ०९७६) पुढील टायर अचानक फुटल्याने टँकर दुभाजक तोडून मुंबईकडे जाणाऱ्या अॅसेन्ट कार (क्र. एमएच ४८ एफ ३०७३)वर आदळून अपघात झाला. या अपघातात कारमधील समीर शेख ( ३८) व संजय कुमार शुक्ला (२७) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर खत्री (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकांच्या मदतीने वाहनात अडकलेले मृतदेह व जखमीना बाहेर काढले. जखमीला तातडीने पुढील उपचारार्थ नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात हलविले. महामार्ग एक तास ठप्पअपघात झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील एकही रु ग्णवाहिका अथवा आपत्कालीन यंत्रणा वेळीच न आल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली. अखेर घटनास्थळी पोहचलेले घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, उपनिरीक्षक कमलेश बच्छाव, संदीप शिंदे, नितीन भालेराव, राजेंद्र कांगने आदिंनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
घोटीजवळ अपघातात दोघे ठार; एक गंभीर
By admin | Published: January 18, 2017 1:08 AM