नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी तेलंगणातील असून, शिक्षणासाठी औरंगाबादला वास्तव्यास होते. गिरिधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०), अनुषा (२१), रघुवंशी (२१), कोटी रेड्डी (२०) आणि काव्या एल (२०, रा. हैदराबाद) हे विद्यार्थी नाशिक येथे आले होते. मंगळवारी (दि.१७) ते दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी गेले. त्यांनी त्यांच्या दुचाकी वनविभागाच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या केल्या. यातील तिघांनी धबधब्याच्या तळाकडे जाण्याचा मानस व्यक्त केला. मात्र गिरिधर, व्यंकटेश आणि काव्या या तिघांनी वरच थांबणे पसंत करत तुम्ही दरीकडे जाऊ नका, असा सल्लाही तिघांना दिला.सायंकाळ होत आल्याने अन्य विद्यार्थी ठरल्याप्रमाणे नाशिक येथे सुला वाईनला मुक्कामी राहिले. मात्र मित्र अजूनही आले नाहीत, त्यांचा मोबाईल लागत नाही म्हणून रात्री ९ वाजेच्या सुमारास काही मित्र पुन्हा तळेगाव येथे पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी धबधब्याच्या जवळ जाऊन शोध घेतला असता रस्त्यात चप्पल, तसेच धबधब्या जवळ घड्याळ आणि दोन मोबाइल आढळून आले. शिवाय अनुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. प्रशासनाने पोलिसांसह घटनास्थळी बचावकार्य सुरू केले.वैनतेय गिर्यारोहण ग्ाििरभ्रमण संस्थेचे दयानंद कोळी, संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब कानमहाले, रमेश वझे, चेतन खर्डे, रोहित हिवाळे आदींचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनुषाचा मृतदेह बाहेर काढला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. उशिरा एका विद्यार्थ्याचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. मात्र, एकजण अद्यापही बेपत्ता असून, अंधारात अडथळे येत असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. गुरुवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.‘सेल्फी’चा संशयमयत अनुषाला सेल्फीची खूप आवड होती. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तिनेच आग्रह धरला असावा. त्यामुळे धबधब्याच्या जवळ दगडावर उभे राहून सेल्फी घेत असताना पाय घसरला असावा आणि तिला वाचवण्यासाठी दोघांनी प्रयत्न करताना तेही पाण्यात बुडाले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.