वणी : वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले. सुरगाणा तालुक्यातील हतरुंडी येथील राजेश देविदास वाघमारे (२१) व धनराज वसंत वाघमारे (१७, दोघे रा. कळवड) हे दोघे दुचाकीने सापुतारा-वणी रस्त्यावरून मार्गक्रमण करीत होते. धनाई मंदिर परिसरात अज्ञात वाहनाने या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवकांना गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थ व पोलिसांनी तसेच १०८ या रुग्णवाहिकेने धाव घेतली. रस्त्याच्या मधोमध झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वणी-सापुतारा, वणी-पिंपळगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगात वाहने चालविण्याची स्पर्धाच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.दुचाकीचालकांना याचा फटका बसत असुन अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. त्यात दूरवरच्या प्रवासात काही दुचाकीस्वारांकडून विनाहेल्मेट वाहन चालवून बेफिकिरी दाखविली जात आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 1:01 AM
वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले.
ठळक मुद्देवणी-सापुतारा रस्त्यावर घडली दुर्घटना