सुरगाणा : अज्ञात व्यक्तींकडून वाहने जाळणे, काचा फोडणे अशा घटनांमुळे नागरिक दहशतीखाली असतानाच शहरातील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. लहान-मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने भीतीचे सावट पसरले आहे.शहरातील बांगड्यांचा किरकोळ व्यापार करणारे मतिन मणियार यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. याकरिता आपल्याकडील थोडं फार सोनं नाशिक येथील पतपेढीकडे गहाण ठेवून दोन लाख, सत्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यापैकी सत्त्याऐंशी हजार रुपये घराच्या बांधकाम करणाऱ्या कारागिरांना दिले. उर्वरित एक लाख नव्वद हजार रुपये त्यांनी कपाटात ठेवले. यादरम्यान त्यांच्या मुलाची तब्येत बिघडल्याने वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उशीर झाल्याने ते वणी येथे नातेवाइकांकडे थांबले. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. त्याने कपाट फोडून एक लाख नव्वद हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच पायातील चार हजार रुपये किमतीची चांदीची पट्टी, सहा हजार रुपयांची मुरणी असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत मतिन मणियार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी भेट देऊन पाहणी करून घटनेची माहिती घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील खरे, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे पुढील तपास करीत आहेत.
सुरगाण्यात दोन लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:56 PM