नाशिक : बँगेत लाखो रुपये असल्याचे भासवत ती पैशांची बॅग सांभाळण्यास सांगून महिलेचा विश्वास संपादन करीत तिचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने चाेरट्यांनी लांबविल्याची घटना रविवार कारंजा येथे घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसुम किशोर चाफेकर (रा. चिंचबनरोड, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, चाफेकर या गुरुवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास रविवार कारंजा भागात गेल्या होत्या. त्यांना ३० ते ३५ वयोगटातील तिघांनी गाठले. लाखोंची रोकड बॅगेत असल्याची बतावणी करीत बॅग जड असल्याने घेऊन फिरता येत नसल्याचे सांगत ती बँक त्यांच्याकडे काही वेळासाठी सांभाळण्यााठी देत त्यांचा विश्वास संपादन केला. चाफेकर यांचा विश्वास संपादन करून संशयित भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि सोनसाखळी असे २ लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला. बराच वेळ उलटूनही भामटे न आल्याने महिलेस संशय आल्याने तिने बॅग उघडून पाहिली, त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी लांबविले महिलेचे दोन लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:19 AM