नाशिक : नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.
वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ९० टक्के नागरिकांनी जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी केली आहे. तर जवळपास दोन हजार घरांमध्ये अनधिकृत जोडणी करून घेतली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या अनधिकृतपणे नळजोडणीतून महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महापालिकेने नळजोडणी अधिकृत करून घेण्याचे आवाहन करूनही अद्यापर्यंत कोणीही नळजोडणी अधिकृत करून घेतली नाही. नाशिक शहरात अशाप्रकारे अनधिकृत नळजोडणीतून सुमारे साडेचार लाख लिटर पाण्याची चोरी होत असताना एकट्या वडाळागावात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दोन लाख लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. एवढ्यावरच या भागातील पाणीप्रश्न भागत नसून, अपुºया पाण्याची ओरड करून या भागात टॅँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अनधिकृत नळजोडणी तोडण्यास असमर्थ असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.