नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २) जाहीर होणार आहे. नाशिक विभागातील १ लाख ९७ हजार ४३८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना १४ जून रोजी त्यांच्या शाळांमधून गुणपत्रिका वितरित केल्या जाणार आहेत.
मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्याने इयत्ता दहावीच्या निकालाचीही प्रतीक्षा होती. मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत नाशिक विभागातून सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नाशिक जिल्ह्यातील ९१,७०७, धुळे - २८,४७२, जळगाव - ५६,८९४ तर नंदुरबारमधील २०,३६५ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आल्यानंतरही विभागात कॉपीचे काही प्रकार आढळले होते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत या प्रकाराला आळादेखील बसला आहे.
विशेष म्हणजे नाशिक विभागातून यंदा परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे. विभागातून ९०,११७ मुली परीक्षार्थी आहेत तर मुलांचे प्रमाण १,०७,७३२ इतके आहे. बारावीत विद्यार्थिनींनी बाजी मारल्याने दहावीच्या निकालात मुलींच्या टक्केवारीकडे लक्ष असणार आहे. विभागात दरवर्षी मुलींचा डंका असतो. यंदाही हीच परंपरा कायम राहणार का? याबाबत उत्सुकता असेल.