नांदूरशिंगोटे (सचिन सांगळे) : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा व मऱ्हळ खुर्द शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन बिबटे मंगळवारी (दि.२६) सकाळी जेरबंद झाले. यामध्ये नर व मादीचा समावेश असून परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
शहा - कोळगावमाळ रस्त्यालगतच्या परिसरात बिबट्याने शेळ्या व कुत्रे फस्त केल्याने दोन दिवसापूर्वी वनविभागाने ऊसाच्या व गिणी गवताच्या क्षेत्रात पिंजरा लावला होता. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे दिघे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. दुसऱ्या बिबट्याचा वावर मऱ्हळ खुर्द शिवारातील वावी रस्त्यालगत होता. येथील रमेश बन्सी कुटे यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला.
दोन्ही बिबटे नांदूरशिंगोटे येथे आणले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांनी दिली.