नाशिक : अवैधरीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. यात नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडीमधील स्वप्नील सोसायटीतील राहुल संदीप सोनवणे (२७), उपनगरच्या गोसावीनगर लोखंडे मळा येथील माधव पार्कमधील वतन ब्रह्मानंद वाघमारे (३१) असे अटक केलेल्या संशयितांचे नाव आहेत.पोलिसांनी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रोकडोबावाडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ कारवाई केली. याठिकाणी दोघे जण गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार येवाजी महाले यांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित सोनवणे व वाघमारे यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दोघांचीही अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला एक गावठी कट्टा व प्रत्येकी मॅगझीनमध्ये दोन-दोन जिवंत काडतुसे मिळून आले. तपासादरम्यान सोनवणे यांनी उमरठी (मध्य प्रदेश) येथून चार कट्टे आणल्याची माहिती दिली असून, त्यानंतर सोनवणे यांच्या घरून दोन कट्टे असे एकूण चाक गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे, दोन मोबाइल, असा ३ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांनी केलेल्या कारवाईत पोलीस हवालदार रवींद्र बागुल, संजय मुळक, प्रवीण कोकाटे, पोलीस नाईक विशाल काठे, विशाल देवरे, गणेश वडजे, चालक नजीम पठाण आदींचा समावेश होता.शहरात गावठी कट्टे तसेच इतर हत्यारे वारंवार जप्त करण्यात येत आहे. अवैध शस्त्र व्यवसायामुळे पोलिसांसमोर शस्त्रांची तस्करी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांच्या तपासात अवैध शस्त्रांची तस्करी जिल्ह्याच्या मध्य प्रदेशलगतच्या सीमा भागातून होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सीमा ओलांडून कारवाई करण्याबाबत नियोजन सुरू आहे.-विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त, नाशिक शहर
गावठी कट्टा बाळगणारे दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:26 AM