घोटी : येथील शेतजमिनीची बिगरशेती सनद परवानगी मिळवण्यासाठी दोघा व्यापारी बंधूंनी खोटे संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षऱ्या करून जमीनमालकाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. सुनील आणि सतीश कांतीलाल धोका अशी दोघा व्यापा-यांची नावे असून त्यांच्याविरोधात घोटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खोट्या स्वाक्ष-यांच्या आधारे मिळालेली बिगरशेती परवानगी रद्द करण्याची मागणी जमिनमालक पारस कांकरिया यांनी केली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटी येथील व्यापारी पारस संचालाल कांकरिया यांच्या मालकीचे सर्व्हे क्र मांक ८६ आणि ८७ शेतजमीन आहे. या दोन्ही गटातील काही क्षेत्राची विक्र ी घोटी येथील सुनील कांतीलाल धोका आणि सतीश कांतीलाल धोका यांना खरेदीखताने केली आहे. त्यानुसार संबंधित विक्र ी केलेल्या क्षेत्राची शासकीय मोजणी करून हद्दखुणा कायम केल्या आहेत. तथापि सुनील धोका, सतीश धोका यांनी व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी जिल्हाधिका-यांकडे अर्ज केला. ह्या अर्जात सहमालक पारस कांकरिया यांच्या उर्वरित क्षेत्राचा विनापरवानगी समावेश करून त्यांच्या नावाचा मुद्रांक घेतला. मुद्रांकावर संमतीपत्र तयार करून त्यावर पारस कांकरिया यांच्या खोट्या स्वाक्ष-या केल्या. शासनाची दिशाभूल करून खोट्या संमतीपत्राच्या आधारे बिगरशेती परवानगीची सनद मिळवली. याआधारे दोघा व्यापा-यांनी वादग्रस्त जागेवर हर्ष इंडस्ट्रीज उभी केली. याबाबत माहिती समजताच पारस कांकरिया यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून कागदपत्रांवरील सह्या खोट्या असल्याची खात्री करून घेतली. याप्रकरणी इगतपुरी आणि मुंबई उच्च न्यायालयात दावा देखील सुरू आहे. त्यामुळे बिगरशेती परवानगीसाठी पारस कांकरिया यांची संमती मिळणार नसल्याने दोघा व्यापा-यांनी खोट्या स्वाक्ष-या आणि संमतीपत्र तयार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दोघा व्यापारी बंधूंनी जमिनमालकाला दिला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 5:24 PM
गुन्हा दाखल : खोटे संमतीपत्र करुन फसवणूक
ठळक मुद्दे मुद्रांकावर संमतीपत्र तयार करून त्यावर पारस कांकरिया यांच्या खोट्या स्वाक्ष-या केल्या.