नाशिक : मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या खरेदीला राज्य सरकारने चाप लावला होता. मात्र काही साहित्य खरेदी आवश्यक वाटल्यास त्यास शासन स्तरावरून मान्यता घेण्याची अट टाकण्यात आली होती. आता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील एका निर्णयाने यापुढे जानेवारीनंतर व निवडणुका झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारची साहित्य खरेदी करण्यास सरकारच्या वित्त विभागाने बंदी घातली आहे. वित्त विभागाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाची दोन कोटी रुपयांची चार चाकी खरेदी योजना बारगळल्यात जमा आहे. त्यामुळे हा दोन कोटींचा निधी शासनाला परत करण्याची नामुष्की जिल्हा परिषद प्रशासनावर येणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी चारचाकी वाहन पुरविण्याची योजना घेण्यात आली होती. सुमारे दोन कोटी रुपयांच्या या चारचाकी वाहन खरेदीची अंतिम निविदाप्रक्रिया व पुरवठा आदेशही तयार होते. मात्र ५ डिसेंबरच्या नवीन शासन निर्णयामुळे वाहन खरेदीला चाप लागला होता. शासन स्तरावरून मान्यता मिळविण्यासाठी समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी समाजकल्याण आयुक्त व प्रधानसचिव यांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान ५ जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने आचारसंहितेनंतरच ही चारचाकी खरेदी करण्याचे नियोजन समाजकल्याण विभागाने केले होते. आता वित्त विभागाच्या नवीन निर्णयामुळे कोणतीही खरेदी करता येणार नसल्याने दोेन कोटींची चारचाकी वाहन खरेदी बारगळण्यात जमा आहे. (प्रतिनिधी)
चारचाकीचे दोन कोटी परत जाणार
By admin | Published: January 24, 2017 1:23 AM