पंचवटी : निमाणी बसस्थानकाजवळून रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या पादचा-याचा मोबाईल हिसकावणा-या दोघा संशयितांना शहर वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचा-यांनी सोमवारी(दि़२६) सायंकाळी रंगेहाथ पकडल़े संशयित गौतम दिलीप ताठे (फुलेनगर) व आदित्य शाम पाटील (रा़गिरणारे) अशी या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून चोरीच्या मोबाईलसह धारधार शस्त्रे जप्त केली आहेत़
पंचवटी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार संजयनगर) येथील रहिवासी सनी येवले हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घराकडे पायी जात होते़ यावेळी दिंडोरीनाका येथून चॉकलेटी रंगांच्या होंडा शाईनवर आलेल्या (एमएच १५, एफजे ३७४२) दोघा संशयितांनी पांजरापोळसमोरील भिंतीलगत येवले यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शहर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक गणेश मालावल, नवनाथ रोकडे, मुकुंद रोकडे, संदीप मालसाने, सचिन पाटील हे सेवाकुंज रस्त्याने जात होते़ नागरिकांचा आरडा-ओरडा ऐकून ते घटनास्थळी थांबून संशयित ताठे व त्याचा साथीदार पाटील यांना ताब्यात घेतले़
यावेळी संशयितांनी पोलिस कर्मचा-यांना धक्का - बुक्की करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला़ पोलिसांनी संशयितांची अंगझडती घेतली असता दोघांकडे धारदार शस्त्रे आढळून आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.संशयित सराईत गुन्हेगाररस्त्याने पायी जाणा-या इसमाचा मोबाईल हिसकावून नेणा-या संशयितांपैकी गौतम ताइे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा तर पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली़