नाशिक : गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या अंगणवाड्यांपैकी ७२ बंद अंगणवाड्या सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आणखी एक निर्णय फिरवण्याची तयारी सुरू आहे.महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे सव्वाचारशे अंगणवाड्यांपैकी १३६ अंगणवाड्या गेल्यावर्षी बंद करण्यात आल्या होत्या. यात विद्यार्थी संख्या दाखवितांना बोगस प्रकार घडले तसेच आयसीडीएसच्या अंगणवाड्या तसेच महापालिकेच्या अंगणवाड्या यांच्यात तेच ते विद्यार्थी दाखविले जातात. याबाबत आयसीडीएसने एक सर्व्हे करून महापालिकेला अवगत केल्यानंतर मुंढे यांनीदेखील तपासणी मोहीम राबवून महासभेनेचे केलेल्या नियमावलीच्या अधारे १३६ अंगणवाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांबरोबरच नगरसेवकदेखील नाराज झाले होते. त्यांनी महासभेत या अंगणवाड्या सुरू करण्याचे ठरावदेखील केले होते, मात्र मुंढे यांनी त्यावर अंमलबजावणी केली नव्हती.राधाकृष्ण गमे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर या विषयावर मवाळ भूमिका घेतली. अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करून नंतर १३६ पैकी ६२ अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. आता उर्वरित ७२ अंगणवाड्या सुरू करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने अंगणवाडी सेविकांसाठी लढणाऱ्या हितरक्षक दलाला लिखित स्वरूपात दिली आहे. त्यामुळे मुंढे यांचा हा निर्णयदेखील फिरवला जाणार आहे.
मनपाच्या आणखी ७२ अंगणवाड्या सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:26 AM