शिंदे गाव येथे ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास दरोडेखाेरांनी सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून तेथील सुमारे २७ लाख रुपयांचा मद्यसाठा लुटला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एक व दोनच्या पथकाने नवी मुंबई, पुणे, जालना, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तपास करून परराज्यांमधील दोघा सराईत गुन्हेगारांना पकडले होते. त्यांच्याकडील चौकशीतून त्यांना गोदामाची माहिती स्थानिक गुन्हेगाराने दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मंजूर पिंजारी व चंद्रकांत सिनोरे यांना ताब्यात घेतले. मंजूर पिंजारी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात दराेडा, चोरी, घरफोडी असे ११ गुन्हे दाखल असून, चंद्रकांत सिनोरे याच्याविरोधातही दरोडा, चोरी, आर्मॲक्ट असे तीन गुन्हे दाखल आहेत. सिनोरे याने गोदामाची रेकी करून त्याची माहिती दरोडेखोरांना दिल्याचे समोर आले आहे, तर पिंजारी हा दरोड्यात सहभागी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस २० लाख रुपयांची तीन वाहने, २३ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून, सराईत गुन्हेगार मुक्तार अहमद शेख (३५, रा. जम्मू काश्मीर), शंकर मंजू गौडा (४४, रा. कर्नाटक) यांनाही अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे.
दारूच्या गोदाम लुटीतील आणखी दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:16 AM