भगूर : येथे नगरपालिका निवडणुकीची धामधूम जोमाने सुरू होऊन सर्वच पक्षाच्या बैठका, चाचपणी झाली. संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करून वरिष्ठांकडे याद्या पाठविल्या. गुरु वारी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांनी एक जनरल महिला नगराध्यक्ष आणि दुसरा प्रभाग ६ मधून ओबीसी राखीव मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याचे सोबत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अर्जुन टिळे, नाना महाले यांच्यासह काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक राजकीय पक्षांना महिला उमेदवार मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. फक्त शिवसेनेकडे महिला नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवार असून, नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपाकडे आता नगराध्यक्षपदासाठी शोभा भागवत याचे नाव निश्चित होऊन नगरसेवक इच्छुक यादी तयार झाली आहे आणि रिपाइं भाजपाच्या सोबत असल्याने तीन जागा रिपाइंला, तर भाजपा चौदा अशा १७ जागा लढवल्या जाणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता असून, नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून प्रेरणा बलकवडे निश्चित मानल्या जात आहेत. नगरसेवक पदासाठी अजूनही घोळ चालू आहे. त्यामुळे आजपर्यंत इतरांचे अर्ज दाखल नाही तर अपक्ष परिस्थिती पाहून शेवटी काही अर्ज दाखल करण्याची चर्चा चालू आहे. दरम्यान, भगूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून अनिता करंजकर, भारतीय जनता पक्षाच्या शोभा भागवत आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदावर निवडणूक लढविणार आहे हे निश्चितच मानले जात आहे.
भगूरला दोन आॅनलाइन अर्ज दाखल
By admin | Published: October 27, 2016 11:39 PM