सायखेडा : करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबरून दुचाकीचा वेग वाढवला. पण बिबट्याने गाडीचा पाठलाग करत गाडीच्या जवळ जात अंदाज घेऊन गाडीवर झेप घेतली. नशीब बलवत्तर म्हणून गाडीच्या मागील बाजूपर्यंतच झेप आली. काही क्षणात गाडी पुढे निघून गेली. त्यांच्याच पाठीमागे रामेश्वर शिंदे आणि संतोष राजोळे हे गाडीवर येत होते. बिबट्याने आपला हल्ला त्यांच्याकडे वळवला आणि त्यांच्यावर हल्ला केला. यात ते दोघेही जखमी झाले. म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी बिबट्या रस्त्यावर किमान अर्धा तास येरझऱ्या घालत होता. कोणाचीही हिंमत झाली नाही. आजूबाजूला वस्तीवर राहणारे नागरिक आणि रस्त्याने जाणारे प्रवासी जमले. गाडीच्या लाईटच्या प्रकाशात बिबट्याला जवळून नागरिकांनी पाहिले. दुचाकीस्वरांचे प्रसंगवधान आणि नशीब बलवत्तर असल्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 1:11 AM