नाशिक : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी शिस्तीचे पालन करत कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. कर्तव्य बजावताना आपल्याकडून कुठेही कोणत्याही प्रकारे बेभानपणे वर्तणूक होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा खाकीला ‘डाग’ लावणाऱ्यांवर कुठलीही मेहेरनजर दाखविली जाणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कारवाईच्या माध्यमातून दिला आहे. बेशिस्त व बेफिकीरपणे कर्तव्य बजावणाºया दोन पोलीस अधिकाऱ्यांचे त्यांनी या आठवड्यात निलंबन केले.पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर यांनी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रात्रपाळीवर गस्तीवर असलेले पोलीस शिपाई सचिन चौधरी यांच्या कानशिलात लगावून शासकीय कामात अडथळा आणला होता. या प्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पळशीकरविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी चौकशी करून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशी अहवाल सोपविला. यानंतर नांगरे पाटील यांनी पळशीकर यांचे निलंबन केले.मंगळवारी (दि.७) रात्री चौधरी नानावली परिसरात गस्तीवर असताना मथुरा हॉटेल द्वारका येथे रस्त्यावर वाद सुरू असल्याचा बिनतारी संदेश पोलीस ठाण्याकडून तत्काळ सीआर मोबाइल वाहनाला मिळाला. चौधरी हे तत्काळ वाहनासोबत द्वारका येथे दाखल झाले. यावेळी पळशीकर हे एका अस्लम तस्सवूर शेख नावाच्या इसमासोबत वाद घालताना आढळले. रात्रीचे साडेबारा वाजत असल्यामुळे चौधरी यांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवून घरी जाण्यास सांगितले, मात्र याचा राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा काय मला शिकवितो, अन् पोलीस स्टेशनला घेऊन जातो...’ असे सांगून चौधरी यांच्या कानशिलात लगावली होती. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनीही बेशिस्तपणे गैरवर्तन केल्याचा प्रकार दस्तुरखुद्द नांगरे पाटील यांच्यापुढे नागरिकांनी उघड केल्याने त्यांचीही चौकशीअंती बदली करण्यात आली.‘दबंगगिरी’ खपवून घेतली जाणार नाहीपंचवटी पोलीस ठाण्यातील दबंग अधिकारी दीपक गिरमे यांनीही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कर्तव्य बजावत एका व्यावसायिकाला ‘अवैध धंदे करतो, तुझ्यावर गुन्हे दाखल करेल’, असे धमकावून दोन लाख रुपयांच्या मागणीसाठी आडगाव येथील त्याच्या कारखान्यात नेऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणीही चौकशी करून आठवडाभरानंतर नांगरे-पाटील यांनी गिरमे यांनाही निलंबित केले.
दोन पोलीस अधिकारी आठवडाभरात निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:58 AM