इंदिरानगर : दरोडा टाकण्याच्या हेतूने मोटारीतून संशयास्पद टोळके फिरत असल्याची गुप्त माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने तातडीने माग काढत संशयित दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चेतनानगर या भागात गुन्हे शोधपथकाने दरोडेखोरांना रंगेहाथ ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक जमील शेख व कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीवरून दरोडेखोरांचा माग काढला. दरम्यान, मारुती मोटार (एम.एच१५ सीडी ६२४९) संशयास्पद उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ मोटारीपुढे वाहन आडवे लावले. यावेळी अंधाराचा फायदा घेत मोटारीमधील तीन संशयितांनी दरवाजा उघडून पळ काढला; मात्र पोलिसांनी संशयित आरोपी अतुल जालिंदर मगर (२२, रा. पवननगर), वैभव अनिल बोडके (२३, रा. राणेनगर) या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळावरुन फरार झालेले तिघेही तडीपार सराईत गुन्हेगार असून, पोलीस त्यांचा वडाळागावात शोध घेत आहे. तडीपार गुंड तडीपाराचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले असून, त्यांनी पुन्हा गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली आहे. फरार झालेल्या संशयितांपैकी दोघे यापूर्वी तडीपार होते. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामधून लोखंडी गज, चाकू, कोयता, कटावणी, टॉमी, स्क्रू ड्रॉवरसह विविध साहित्य ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)
दोन दरोडेखोर ताब्यात
By admin | Published: June 16, 2016 11:22 PM